जयरामांचा मोबाईल आणि संडास
एकदा जयराम नवीन मंत्रालयाचा ( ग्रामीण विकास ) कारभार प्रत्यक्ष बघण्यासाठी एका खेड्यात जातात, तर त्यांना तिथे लोक शेतात उघड्यावर शी करताना दिसतात. आता तुम्हाला वाटेल, त्यात काय एवढेसे. आपणही कालपरवा पावेतो असेच उघड्यावर करत होतो की. अगदी मुंबईतही. तर जयरामांचे निरिक्षण मोठे मार्मिक. ते म्हणतात ह्यांच्या हातात एवढा स्मार्ट मोबाईल फोन आहे पण शी S ! मात्र उघड्यावर ?
जयराम जेव्हा शेतातून शीला बसलेल्याच्या शेजारून जात होते तेव्हा धोंडूच्या हातातल्या आयफोनने खां खां असा खोकण्याचा आवाज काढला. आयफोनवरचे हे ऍप, ऍपलने नुकतेच खास ग्रामीण जनतेसाठी काढले आहे. त्याचे काय आहे की कित्येक वेळा हे शेतात शी करत असताना शिळोप्याच्या गप्पा मारत असतात किंवा काही वाचत असतात किंवा काही, ढिंक चिका-ढिंक चिका असे ऐकत असतात. नेमके त्याच वेळेस कोणी शेजारून जात असेल तर किती अवघड प्रसंग ना ? म्हणजे शेजारून जाणार्याला हो ! तर ह्या नवीन ऍप मध्ये कोणी तीन फुटावर आले की सेंसर ते ओळखतो व मग मोबाईल खास असे आवाज काढतो. जसे: खां खां असा खोकण्याचा किंवा हां S असा कण्हण्याचा ! तुम्ही आवाजाची पाहिजे तशी ट्यून सिलेक्ट करू शकता. बदलूही शकता.
जयरामांना विश्वासच बसेना. त्यांनी धोंडूला सांगितले की तुझे आटपल्यावर मला जरा नवीन ऍप्स दाखवशील का ? धोतरालाचा हात पुसत धोंडू त्याचा लेटेस्ट फोर-एस सेट जयरामांना दाखवू लागला. तो म्हणे, "साहेब ह्यात जीपीएस घातले आहे." जयराम म्हणू लागले की शेतात काय करायचेय जीपीएस ? इथे सगळेच उजाड आहे. तर धोंडू नवीन तंत्रज्ञान त्यांना समजावून देऊ लागला. तो म्हणे "हे पहा सर एका जागी घाण केली की तिथे ती तीन दिवसात वाळते. त्याआधी तिथे करता येत नाही व मग चौथ्या दिवशी आपण पुन्हा त्याच जागेवर... तर ह्यासाठी जीपीएस वापरल्या जाते. ह्याने कोणते स्पॉटस् उपलब्ध आहेत ते गिर्हाईकाला कळते. ज्या जागा रिकाम्या आहेत तिथे "खाली है" अशी सूचना मिळते तर ज्या अजून ओल्या आहेत तिथे "हाउस फुल्ल" असा आवाज येतो, व मग आपली हौस दुसरीकडे पुरवावी लागते. त्यामुळे होते काय की समजा कधी कधी अर्जंट कॉल आलेला असेल तर जागा हुडकण्यात वेळ वाया जात नाही..."
जयराम म्हणू लागले की अरे पण तुम्हाला हे परवडते कसे ? तर धोंडू कींव करत सांगू लागला की ते सिबल साहेबांना माहीत आहे सर. त्यांनी इनकमिंग फ्री केले आहे ना ? आता हे तांत्रिक कारण जयरामांना समजेना. ते म्हणू लागले की अरे तुम्ही इथे जे करता ते तर आउटगोईंग आहे ना ? मग इनकमिंग फ्री असले तरी....धोंडू नीट समजावत सांगू लागला अहो साहेब इनकमिंग म्हणजे आपल्या थ्रीजी सेटवर हो साहेब, शीचे नाही म्हणत आम्ही. स्पॉट पाठवणारा जीपीएस ने आम्हाला पाठवतो, रिकामी जागा दाखवतो, ते आम्हाला इनकमिंग असते व म्हणून फ्री पडते ना ? पार्लमेंटमध्ये दुसर्यांना मध्येच अडवायची सवय लागलेले जयराम, लगेच त्याला अडवत विचारतात : पण पाठवणार्याला तर खर्च लागेलच ना ? त्यावर त्यांच्या अज्ञानाची कीव करत धोंडू सांगतो, अहो साहेब, पाठवणारा बलवाचा भाच्चा आहे साहेब. त्याला सगळेच फ्री आहे, अगदी तिहारला कॉल करायचा तरी तो फ्री आहे !
ह्या भेटीने प्रभावित झालेले जयराम राहूलला गाठतात व त्याला सांगतात मी एक क्रांतीकारक बिल सदनात मांडू इच्छितो. राहूलला ते समजावून सांगू लागतात की सभागृहात कित्येक वेळा काही खासदार घाण करून ठेवतात व मग पुढच्या निवडणुकीलाच आपल्याला कळते. त्या ऐवजी मला फील्ड एक्स्पिरियन्स आहे तसे करू यात. प्रत्येक खासदाराकडे आपण एक आयफोन फोर-एस मोबाईल द्यायचा. त्यावर जीपीएस लोड करून द्यायचे. त्याने काय होईल, की खासदारांनी कुठे कुठे घाण करून ठेवली आहे ते जीपीएसने लगेच कळेल व मग ते आवाजी मतदान करतील S : "मंजूर है" किंवा तशी टयूनच मोबाईलवर लोड करता येईल. सगळे कसे ऍटोमॅटिक व मॉडर्न !
----------------------------------------------------------