अण्णांच्या मागे परदेशी हात !
अण्णा हजारेंच्या आंदोलनाने सगळा देश पेटून निघाला. काही केले तरी लोक ऐकेनात. सगळे रस्त्यावर उतरले. हरताळ, कॉलेजे, शाळा बंद, लोकसभेच्या खासदारांना लोकांनी गराडा घातला, त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडले. पार्लमेंट जवळ जवळ बरखास्त करायची वेळ आली. आता ह्यावर शेवटचा उपाय काय म्हणून कपिल सिबल, पी.चिदंबरम, अंबिका सोनी, पंतप्रधान मनमोहन सिंग व राहूल गांधी अगदी शेवटचे खलबत करायला बसले. काहीच उपाय सुचेना. मनमोहनसिंग म्हणाले की मॅडम इंदिरा नेहमी म्हणायच्या ह्यामागे परदेशी शक्तींचा हात आहे व मीही तसेच सांगितले आहे, तर आपण त्या दिशेने चौकशी का करू नये ? आता दुसरा काही उपायच सुचेना म्हणून चिदंबरम ह्यांना सिबीआय मार्फत ताबडतोब चौकशी करायला सांगण्यात आले. चौकशी करता करता एक परदेशी महिला अमेरिकेत न्यूयॉर्क येथे कॅंसरवर काही उपचार घेत आहे असे सिबीआयला कळले. ते तिथे पोचले. दवाखान्याच्या रूमबाहेर एक नर्स उभी होती. त्यांनी तिला तिचे नावगाव विचारले. तिने नाव सांगितले ऍना व गाव इटाली. तेव्हढ्यात आतून मोठ्याने कण्हण्याचा आवाज आला व लगोलग त्राग्याने एक हुकूम आला.....गीव्ह एव्हरिथिंग टू ऍना.. सिबिआयचा तपासक आत जाऊन विचारू लागला, टू व्हूम मॅडम ? ...अरे ऍना, ऍना, ऍन्ना, . तपासक बाहेर आला. त्याने चिदंबरम साहेबांना फोन लावला. म्हणाला साहेब ती परदेशी व्यक्ती सापडली. तिने सांगितले आहे की गीव्ह एव्हरिथिंग टू अन्ना. चिदंबरमचा विश्वासच बसेना. पण आता मॅडमच सांगताहेत तर काय करा ? तरी त्यांनी खात्री करण्याकरिता विचारले....व्हाट ? टू अण्णा ? तिकडून उत्तर दिले सिबिआयच्या अधिकार्याने की यस सर...टू अण्णा ...असेच मॅडम म्हणताहेत.
पंतप्रधान खुश झाले, म्हणाले बघा मी म्हणत नव्हतो का, परदेशी शक्तीचा हात निघाला ना ? ठीक आहे चिदंबरमजी, आता ह्या परदेशी शक्तीचा जो हुकूम आहे त्याप्रमाणे अण्णाजी को सब दे दो भाई...क्या साब, लोकपाल भी दें दें ? हां दे दो !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा