बुधवार, ३ ऑगस्ट, २०१६

मित्र

-------------------------
मित्र
-----------
मला अजिबात मित्र नाहीत. त्याचे खापर मी माझ्या शब्दकोशावर फोडीन म्हणतो. कारण माझ्या शब्दकोशात आधी जो शब्द येतो तो आहे मित म्हणजे मोजका. आणि त्यानंतर येतो मित्र. त्यामुळे मोजकाच असलेला तो मित्र असा मी अर्थ काढला असावा.
आणि झालेही असेच. इंजिनियरिंगला पुण्याला हॉस्टेलला असताना आमच्याच मजल्यावर एक पारशी मुलगा होता. खरे तर तो इतका देखणा, गोरा, स्मार्ट आणि परत हुशार, असल्याने माझा मित्र होईल असे जाम वाटले नव्हते. पण तो होता बिजापूरचा व त्यामुळे त्याला मराठी चांगले येई. त्यामुळे आमची मैत्री झाली होती.
मैत्री म्हणजे किती दाट ! त्याकाळी जवळ जवळ दिवसातले २० तास तरी आम्ही बरोबर असू. त्याच्या नादाने मी नॉन-व्हेज खायला शिकलो, सिनेमे पाह्यले व त्याकाळात कॅंपातल्या ऑंट्याकडे जाऊन देशी ठर्राही प्यालो. सहा रुपये तासाने तो स्कूटर घेऊन यायचा व आम्ही अशा चकरा मारायचो. नंतर तो एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्यावर होता. तो होताच इतका हुशार की त्याच्याबद्दल मत्सर वाटायच्या आधी त्याच्या हुशारीचा अभिमानच वाटायचा. मग मी मुंबईला आलो व तो कुठे कुठे गेला, काय माहीत नाही. आम्ही चाळीस वर्षे भेटलो नाही. तरीही मला वाटे माझा मोजका मित्र तो हाच.
मग एकदा मी होस्पेटला नोकरीनिमित्त असताना बिजापूरहून जाताना त्याचा शोध घेतला. त्याला भेटलो, त्याचे घर पाहिले. आणि मला त्याला भेटल्याचे अपार वाईट वाटले. ज्याच्या बद्दल एवढ्या मोठ्या मोठ्या कल्पना मी बाळगल्या तो एका गल्लीत एका साधारणशा घरात राहात होता. मला ह्या नियतीचे फार वाईट वाटले. माझा भ्रमनिरास झाला.
ह्यालाही आता पंधरा वर्षे होत आली. त्यानंतरही आम्ही कधी परत भेटलो नाही.
आता माझे फेसबुकवर भले ६०० मित्र आहेत पण मित्र-दिवसानिमित्त कोण बरे माझा मित्र असा विचार केला तर फक्त त्याचेच चित्र सामोरे येते.
मित नंतर मित्र, हा क्रम लावणार्‍या शब्दकोशाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, ह्या मित्र-दिवसाच्या दिवशी !
-----------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा