पूल-ब्रिज-सेतु
--------------------
पुलाखालून बरेच पाणी वाहून जाते, पण इथे पूलच वाहून गेला आहे. पूलही कसा, तर शंभरी भरलेला. पुलांचे असे वाहून जाणे काय दाखवते ? पाण्याची मातब्बरी की पुलाची ? का आपल्या अज्ञानाची वाहती गंगा ? वैयक्तिक पातळीवर आपल्याला पुलाचे काय कळते ?
आम्ही १९६१ साली इंजिनियरिंगच्या पहिल्या वर्षाला होतो तेव्हा सालाबादाप्रमाणे आम्ही शेजारच्याच संगमच्या रेल्वे पुलाची “फॅक्टर ऑफ सेफ्टी” काढायला गेलो होतो. आमच्या मोजमापाने ती चार भरत होती व प्रत्यक्षात म्हणे सहा होती. म्हणजे सहा पटीने जास्त भार आले तरी त्या पुलाला काही ढिम्म होणारे नव्हते.
महाडच्या पुलाशेजारी एक नवीन पूल झालाय, त्याच्याने पाण्याचा मारा जुन्या पुलाच्या पायथ्यावर होवू लागला व त्याने त्याच्या कमानी खाली आल्या. शिवाय वाळू उपसल्याने पुलाच्या भक्कम पायालाच खिंडार पडले होते.
असे पूल वाहून गेल्यावरच आपल्याला का कळते ? कारण एरव्हीचे आपले कळणे अगदी वरवरचे असते. जशी पुलावरून जाणारी वाहने ! त्यांना स्वतःचे वजन माहीत नसते, पुलाची ताकद माहीत नसते, ताकद कमी झालीय का तेही माहीत नसते. कळते ते पूल वाहून गेल्यावरच ! असल्या कळण्याने काय कप्पाळ कळते ?
बरे ही अज्ञानाची गटार-गंगा फक्त आपल्याकडेच वाहते आहे असे नाही तर सॅन फ्रान्सिस्को इथला प्रसिद्ध बे ब्रिजही वादाच्या भोवऱ्यात आहे. कारण कुठला तरी एक पार्ट रिजेक्ट झाला आहे म्हणे व त्याने त्या ब्रिजला धोका आहे.
आपले ज्ञानाचे सेतु केव्हा बळकट होणार ?
------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा