विनोदाचे भागध्येय : धक्का
--------------------------
ज्या विनोदावर आपण फिदी फिदी हसलो होतो, तोच जर पुन्हा ऐकला तर हसू तर येत नाहीच , पण कीव येते ! हमखास खसखस पिकवण्याचे सामर्थ्य असलेला विनोद हा प्रकार अशा शापाला वाहिलेला आहे. तो कायम नवा कोराच असावा लागतो !
विनोद हा प्रकार अपेक्षांचे प्रचंड भार वाहणारा असतो. एकदा आचार्य अत्रे ह्यांना आम्ही औरंगाबादला आमच्या कॉलेजच्या गॅदरिंगला बोलावले होते व त्यांच्या भाषणाचा विषय होता : विनोद. त्यात ते सांगत होते की विनोदात नेहमी अपेक्षांना धक्का द्यावा लागतो, तरच तो हसू आणतो. त्यावर त्यांनी एक उदाहरणा दाखल विनोद सांगितला . तो असा : एकदा ते एका कार्यक्रमासाठी कुठे बाहेरगावी गेले होते. कार्यक्रम आटोपता आटोपता रात्र झाली व कसेबसे स्टेशनावर आले तेव्हा गाडी सुटतच होती. समोर आलेल्या डब्यात ते चढले. डबा रिकामाच होता. सकाळी ते दरवाज्यात उभे राहून स्टेशन पाहू लागले तो आजूबाजूचे लोक हसत होते. त्यांना वाटले आपण किती लोकप्रिय ! आपल्याला लोक दाद देत आहेत. असे दोन तीन स्टेशनावर झाले व स्वारी खूष झाली. गाडीतून उतरताना त्यांनी सहज डब्याकडे पाहिले तर तो स्त्रियांचा राखीव डबा होता ! अत्रे म्हणतात की हाच विनोद सांगतांना मी आधीच सांगितले असते की मी चुकून स्त्रियांच्या डब्यात बसलो होतो, तर काहीच हसू आले नसते. तर विनोदासाठी अपेक्षांना धक्का द्यावा लागतो.
विनोद पेरण्यासाठी कायम असे धक्के द्यावे लागतात ! एकदा वाचकाला एक धक्का बसला की तो पुढच्या वेळेस सतर्क राहतो व त्याला हसवायचे असेल तर मग वेगळा धक्का द्यावा लागतो. कायम नवीन धक्क्याचे भागध्येय ल्यालेला विनोद हा एकमेव प्रकार आहे !
----------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा