बुधवार, ३ ऑगस्ट, २०१६

आमंत्रण निमंत्रण

--------------------------------------
आमंत्रण, निमंत्रण
------------------------
आमंत्रण व निमंत्रण हे दोन्ही सकारात्मक शब्द असून त्यात एक चांगले वा वाईट असे काही नाही. दोन्हीचा अर्थ बोलावणे, अवतणे असाच होतो. दोन्ही कडे पायाभूत शब्द आहे मंत्र ज्याचा अर्थ प्रार्थना, स्तोत्र असा आहे. आ हा उपसर्ग लावून पर्यंत, पासून ह्या अर्थाचे शब्द आपण अनेक करीत असतो, जसे : आजन्म ( जन्मापासून), आमरण ( मरणापर्यंत ), आक्रमण , आकर्ण, आक्रोश वगैरे. तसेच नि हा उपसर्ग लावून आपन अनेक शब्द करतो ज्याचा अर्थ ह्याने युक्त, वा लुप्त असा होतो. जसे: निनाद, निपुण,  नि ह्या उपसर्गामुळे नकारात्मकता येते असे आपल्याला वाटते खरे पण नि पासून सुरू होणारे अनेक शब्द असे आहेत की जे सकारात्मक अर्थाचेच आहेत, जसे : निकट, निकष, निकुंज, निकेतन, निखालस, निखिल, निगडित, निगमन, निगराणी, निग्रह, निजणे, निर्णय, नित, नितळ, नितान्त, निदान, निनाद, निपुण, निभणे, निमंत्रण वगैरे. त्यामुळे मंत्र व मंत्र म्हणणे म्हणजे मंत्रण करण्यापर्यंतचे बोलावणे किंवा मंत्रण करण्याने युक्त असे बोलावणे असाच दोन्ही ( आमंत्रण, निमंत्रण ) शब्दांचा अर्थ होतो व दोन्ही अर्थ सम-बलाचे आहेत. असेच समान अर्थाचे शब्द आहेत : आयोजन-नियोजन , आयोग-नियोग.
  संस्कृत व्याकरणात हे दोन शब्द जरा भिन्न अर्थांनी वापरलेले दिसतात.  "गच्छेत्" सारख्या रूपांचा अर्थ सांगताना पाणिनीने विधि-निमन्त्रण-आमन्त्रण-अधीष्ट-सम्प्रश्न-प्रार्थन (पा.सू. ३।३।१६१) इतके वेगवेगळे अर्थ दिले आहेत. त्या सगळ्यांची चर्चा मला करायची नाही, पण निमन्त्रण आणि आमन्त्रण हे दोन वेगळे अर्थ दिले आहेत.  त्यातला फरक काशिकावृत्तीमध्ये "निमन्त्रणम् नियोगकरणम्, आमन्त्रणम् कामचारकरणम्" असा दिला आहे.  म्हणजे निमन्त्रण शब्दाचा "हे केलेच पाहिजे" (अवश्यकर्तव्ये प्रवर्तना, यत्र अकरणे प्रत्यवाय:) असा नियोग म्हणजे आज्ञा असा अर्थ आहे, तर आमन्त्रण म्हणजे तुमच्या इच्छेने हे करायचे असले तर करावे, केले नाही तर काही हरकत नाही (यत्र अननुष्ठानेऽपि न प्रत्यवायस्तत्र प्रवर्तना).  संस्कृतवाङ्मयात हा काटेकोर फरक सगळीकडे दिसत नाही.  महाभारतात दमयन्तीचा बाप भीमराजा तिच्या स्वयंवराचे निमन्त्रण सर्व राजांना पाठवितो - स संनिमन्त्रयामास महीपालान्.  अर्थात् ही आज्ञा नाही, पण आग्रहाचे बोलावणे आहे. 
निमंत्रण ही आज्ञा/कर्तव्य असल्याने ज्यांनी खरेच समारंभाला यावे असे वाटत असेल त्यांना निमंत्रण द्यावे, तर आलात, जमले तर या असे ज्यांना म्हणायचेय त्यांना आमंत्रण द्यावे !
----------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा